Advertisement

विभाज्यतेच्या कसोटया




 विभाज्यतेच्या कसोटया : 2 ची कसोटी

कोणत्याही सम संख्येस 2 ने पूर्ण भाग जातो. उदा. 27720

विभाज्यतेच्या कसोटया : 3 ची कसोटी

जर दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या एक अंकी बेरजेस 3 ने पूर्ण भाग जात असेल, तर दिलेल्या संख्येसदेखील 3 ने पूर्ण भाग जातो. उदा. 27720

27720 या संख्येतील अंकांची बेरीज = 2 + 7 + 7 + 2 + 0 = 18

18 या संख्येतील अंकांची बेरीज = 1 + 8 = 9

9 ला 3 ने पूर्ण भाग जात असल्याने 27720 ला देखील 3 ने पूर्ण भाग जातो.

विभाज्यतेच्या कसोटया : 4 ची कसोटी

जर दिलेल्या संख्येतील शेवटच्या दोन अंकांपासून तयार होणाऱ्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जात असेल किंवा शेवटचे दोन्ही अंक 0 असतील, तर दिलेल्या संख्येसदेखील 4 ने पूर्ण भाग जातो. उदा. 27720

27720 या संख्येतील शेवटच्या दोन अंकांपासून तयार होणारी संख्या 20.

20 या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो.

म्हणून 27720 ला देखील 4 ने पूर्ण भाग जातो.

गंमत म्हणून दुसरे उदाहरण घेऊ - 12345678900.

ही संख्या एका दमात कदाचित वाचताही येणार नाही. परंतु शेवटच्या दोन अंकांकडे पाहून या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो असे सांगू शकतो.



विभाज्यतेच्या कसोटया : 5 ची कसोटी

जर दिलेल्या संख्येच्या एककस्थानी 0 किंवा 5 यापैकी एक अंक असेल, तर दिलेल्या संख्येस 5 ने पूर्ण भाग जातो. उदा. 27720

विभाज्यतेच्या कसोटया : 6 ची कसोटी

जर दिलेल्या संख्येस 2 o 3 या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल, तर दिलेल्या संख्येस 6 ने पूर्ण भाग जातो. उदा. 27720.

ही संख्या सम असल्याने तिला 2 ने पूर्ण भाग जातो.

तिच्या अंकांच्या बेरजेला म्हणजे 2 + 7 + 7 + 2 + 0 = 18 ला 3 ने पूर्ण भाग जात असल्यामुळे 27720 या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो.

म्हणजेच या संख्येस 2 o 3 या दोन्ही संख्यांनी भाग जातो, म्हणून त्या संख्येस 6 नेही पूर्ण भाग जातो.

विभाज्यतेच्या कसोटया : 7 ची कसोटी

दिलेल्या संख्येतील एकक स्थानाच्या अंकाची दुप्पट करावी.

ही दुप्पट उर्वरित अंकातून वजा करावी. तयार झालेल्या संख्येस 7 ने पूर्ण भाग जात असल्यास दिलेल्या संख्येसदेखील 7 ने पूर्ण भाग जातो. उदा. 27720.

या संख्येच्या एककस्थानी 0 असल्याने तो सोडून देऊ. उर्वरित संख्येचा म्हणजे 2772 चा विचार करु.

2772 च्या एककस्थानचा अंक 2. त्याची दुप्पट 4. ती 277 मधून वजा करु. 277 - 4 = 273.

273 साठी पुन्हा हीच कसोटी वापरु.

273 च्या एककस्थानचा अंक 3. त्याची दुप्पट 6. ती 27 मधून वजा करु. 27 - 6 = 21.

21 ला 7 ने पूर्ण भाग जातो, म्हणून 27720 ला देखील 7 ने पूर्ण भाग जातो.

 कसोटया : 8 ची कसोटी

दिलेल्या संख्येतील शेवटच्या तीन अंकांपासून तयार होणाऱ्या संख्येस 8 ने पूर्ण भाग जात असेल किंवा शेवटचे तीन अंक 0 असतील, तर, दिलेल्या संख्येसदेखील 8 ने पूर्ण भाग जातो. उदा. 27720.

यात 27720 या संख्येतील शेवटच्या तीन अंकांपासून तयार होणारी संख्या 720. 720 ला 8 ने पूर्ण भाग जात असल्याने 27720 ला 8 ने पूर्ण भाग जातो.

विभाज्यतेच्या कसोटया : 9 ची कसोटी

दिलेल्या संख्येतील अंकांच्या एक अंकी बेरजेस 9 ने पूर्ण भाग जात असेल तर, दिलेल्या संख्येसदेखील 9 ने पूर्ण भाग जातो. उदा. 27720.

27720 : 2 + 7 + 7 + 2 + 0 = 18, 18 : 1 + 8 = 9.

ज्या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो, त्या संख्येला 9 ने पूर्ण भाग जाईलच असे नाही, मात्र, ज्या संख्येला 9 ने पूर्ण भाग जातो, त्या संख्येला 3 ने निश्चित भाग जातो.

विभाज्यतेच्या कसोटया : 10 ची कसोटी

जर दिलेल्या संख्येच्या एककस्थानी 0 अंक असेल, तर दिलेल्या संख्येस 10 ने पूर्ण भाग जातो. उदा. 27720.


विभाज्यतेच्या कसोटया  व्हिडिओ



विभाज्यतेच्या कसोटया या घटकावर आधारित टेस्ट सोडवा

Post a Comment

0 Comments